प्रोफाइल लोड करत आहे...
विनोबा भावे
अल्प परिचय
आचार्य विनोबा भावे (११ सप्टेंबर १८९५ - १५ नोव्हेंबर १९८२ जन्म: गागोदे ) आचार्य विनोबा भावे यांना गांधीजींनी त्यांचे आध्यात्मिक पूर्वाधिकारी आणि अग्रगण्य सत्याग्रही म्हणून संबोधित केले होते. ‘जय जगत्’ हा नारा देणाऱ्या विनोबाजींचा जन्म पेण येथील गागोदे या गावी (जिल्हा – रायगड, राज्य – महाराष्ट्र) ११ सप्टेंबर १८९५ या दिवशी झाला. त्यांचे कुटुंब पुढे बडोदा येथे गेले. बडोद्याला त्यांनी पुढील शिक्षण घेतले. त्यानंतर गांधीजींबरोबर काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. “गांधीजींबरोबर आपल्याला शांती आणि क्रांती यांचा एकत्रित अनुभव मिळाला” असे ते सांगत. १९५१ ते १९६४ या काळात त्यांनी भारतभर पदयात्रा करून श्रीमंत जमीनधारकांना भूमीहीनांना देण्यासाठी आपली जमीन दान करण्याचे आवाहन केले. या ऐतिहासिक ‘भूदान’ चळवळीत ४७ लाख एकर जमीन दान म्हणून मिळाली. अशा प्रकारची जगातली ही एकमेव अहिंसक आणि क्रांतिकारी चळवळ ठरली. विनोबाजी सखोल आध्यात्मिक वृत्तीचे होते. त्यांनी सर्व धर्मांचा अभ्यास करून सर्व धर्मांच्या शिकवणीची, सारांश स्वरूपात एकत्रित मांडणी केली. त्यांच्या सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या ‘गीताप्रवचने’ या पुस्तकाचा सर्व भारतीय भाषांमधे व अनेक परकीय भाषांमधे अनुवाद झाला आहे. त्यांचे सर्व लेखन १० खंडांमध्ये प्रकाशित झाले असून त्याची पृष्ठसंख्या दहा हजारांहूनही अधिक आहे.