प्रोफाइल लोड करत आहे...
संदीप भानुदास तापकीर
अल्प परिचय
संदीप भानुदास तापकीर (एम.ए. (इतिहास व मराठी), पत्रकारिता) हे इतिहास अभ्यासक, दुर्गअभ्यासक व शिवव्याख्याते आहेत. त्यांची ‘छत्रपती श्री शिवराय’, ‘महाराजांच्या जहागिरीतून... पुणे जिल्ह्यातील २९ किल्ले’, ‘वाटा दुर्गभ्रमणाच्या : सातारा जिल्ह्यातील किल्ले’, 'अपरिचित दुर्गांची सफर : रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ले', 'चला आळंदीला जाऊ। ज्ञानेश्वर डोळा पाहू।', 'महाराष्ट्राची दुर्गपंढरी : नाशिक जिल्ह्यातील किल्ले', 'निजामशाहीच्या गतवैभवाची स्फूर्तिस्थाने : अहमदनगरचे गडकोट', 'रांगड्या दुर्गवैभवाचा खजिना : कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले' आणि 'मालवणी मुलखातील इतिहासाचे पहारेकरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले' ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच त्यांच्या 'छत्रपती श्री शिवराय' या मूळ मराठी पुस्तकाचा इंग्रजी व हिंदी अनुवादही प्रकाशित झाला आहे. हिंदी अनुवादाला महाराष्ट्र राज्याचा हिंदी साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला आहे. ‘रायगड : राजधानी स्वराज्याची’ आणि 'राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार : बॅरिस्टर सरदार वल्लभभाई पटेल' या पुस्तकांचे ते सहलेखक आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या ‘मराठी शब्दकोश’ या प्रकल्पात शब्दकोश खंड - ४, ५ व ६ या तीन खंडांचे साहाय्यक संपादक म्हणून त्यांनी काम केले आहे. 'अरुणगंध' (अरुण बोऱ्हाडे यांच्या साहित्यिक, सामाजिक, कामगार व राजकीय कार्यकर्तृत्वाचा आढावा), 'कर्मयोगी' (के. के. निकम सहस्रचंद्रदर्शन सोहळा), 'सत्यान्वेषी तत्त्वज्ञ' (विश्वात्मक पुण्याईची बेरीज करणारे डॉ. श्रीपाल सबनीस अमृतमहोत्सवी गौरवग्रंथ) आणि 'निरपेक्ष विद्यायात्री' (विद्यार्थिप्रिय अध्यापक शशिकांत जाधव गौरव ग्रंथ) या गौरव ग्रंथांचे संपादन त्यांनी केले आहे. 'गझलगौरव' (प्रदीप निफाडकर साठीनिमित्त गझलवरील ग्रंथ) आणि 'संतसाहित्यातील मूल्यविचार' (प्राचार्य डॉ. शिवाजीराव मोहिते अमृतमहोत्सवानिमित्त गौरवग्रंथ) या दोन गौरव ग्रंथांचे ते एक संपादक आहेत. किल्ल्यांवरील आद्यग्रंथ असणार्या चिं. गं. गोगटे यांच्या ‘महाराष्ट्र देशातील किल्ले : भाग १ व २’च्या दुसर्या आवृत्तीचे ते एक संपादक आहेत. त्यांनी ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या 'जरीपटका' या स्मरणिकेचे, तसेच इंद्रायणी साहित्य परिषदेच्या 'अक्षर इंद्रायणी' या स्मरणिकेचे संपादन केले आहे. ते महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण समितीच्या गड, किल्ले व पुरातत्त्व या उपसमितीचे सदस्य आहेत. १७ जानेवारी २०२६ रोजी त्यांची तीन वर्षांसाठी अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या कार्यकारिणीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे दिला जाणारा कै. निनादराव बेडेकर स्मृती पुरस्कार, ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय व संशोधन केंद्र, अहमदनगरतर्फे दिला जाणारा कै. सरदार आबासाहेब मुजुमदार इतिहास अभ्यासक पुरस्कार, भारत इतिहास संशोधक मंडळाच्या इतिहास संशोधक प्रोत्साहनपर पुरस्काराबरोबरच त्यांना इतरही अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत. केवळ किल्ल्यांना वाहिलेला ‘दुर्गांच्या देशातून...’ हा महाराष्ट्रातील पहिला दिवाळी अंक ते २०१२पासून आजतागायत दर वर्षी संपादित करत आहेत. या अंकातून त्यांनी ४००पेक्षा अधिक दुर्गभटक्यांना लिहिते केले आहे. नव्या-जुन्यांची सांगड घालणार्या या अंकातून एकाही लेखकाचा लेख पुन्हा न घेण्याचे सूत्र त्यांनी कमालीचे यशस्वीपणे राबविले आहे. यातून अनेक लेखक तयार झाले आहेत. त्यांनी ‘दुर्गसंवर्धनाची पहाट...’ या दुर्गसंवर्धनविषयक स्मरणिकेचे संपादन केले आहे. कृष्णकांत कुदळे यांच्यावरील ‘मैत्रेय’ आणि प्रमोद बेल्हेकर यांच्यावरील ‘आत्मानंद’ या गौरवांकांचेही त्यांनी संपादन केले आहे. त्यांचे अनेक दैनिकांमध्ये इतिहास, दुर्गभ्रमंती व दुर्गसंवर्धन या विषयांवर लेख प्रकाशित झाले आहेत. तसेच त्यांनी लोकमत, पुढारी या वर्तमानपत्रांसाठी सदर लेखनही केले आहे. ‘दुर्गांच्या देशातून...’ या दिवाळी अंकासाठी त्यांना मानाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील ४००पेक्षा अधिक किल्ले अभ्यासपूर्ण पद्धतीने पाहिले आहेत; तसेच अनेक मान्यवरांना महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ले दाखविले आहेत. ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांचे लेखनिक म्हणून (१९९९-२००२) त्यांनी काम केले आहे. इंद्रायणी साहित्य परिषदेचे ते अध्यक्ष आहेत. ते सध्या विश्वकर्मा पब्लिकेशन्समध्ये संपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी १००हून अधिक पुस्तकांचे संपादन केले आहे.