प्रोफाइल लोड करत आहे...
नारायण कवठेकर-कुळकर्णी
अल्प परिचय
नारायण कवठेकर कुळकर्णी ह्यांचा जन्म कवठा (खुर्द), ता. रिसोड, जि. वाशिम येथे पिढीजात शेतकरी कुटुंबात झाला. घराणे सांपत्तिकदृष्ट्या सुखवस्तू व सामाजिकदृष्ट्या प्रतिष्ठित होते. मराठी विषयात पदव्युत्तर व शिक्षणशास्त्राची स्नातक पदवी संपादन केली. कवठा ग्रामपंचायतीचे सदस्य (४ वर्षे) होते, कवठा सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष ( ६ वर्षे) होते. प्रारंभी त्यांनी शेतीव्यवसाय केला. १९८० पासून अध्यापनाच्या क्षेत्रात कार्यरत झाले. श्री. कृ. कोल्हटकर महाविद्यालय, जळगाव (जामोद), जि. बुलढाणा, आणि अकोला येथील श्रीशिवाजी महाविद्यालयातून मराठी विषयाचे अध्यापन केले. अलीकडेच स्वेच्छानिवृत्ती घेतली. कवठेकरांचा मूळ पिंड कवीचा. १९७० च्या आसपास वेगवेगळ्या नियतकालिकांतून काव्यलेखनास प्रारंभ केला. १९८० मध्ये ग्रंथाली वाचक चळवळीने प्रसिद्ध केलेल्या 'कविता दशकाची' या प्रातिनिधिक काव्यसंग्रहात त्यांच्या दहा कवितांचा समावेश आहे. त्यानंतर 'हे माझ्या गवताच्या पात्या' (१९८२) आणि मागील पानावरून पुढे सुरू' (१९९७) हे त्यांचे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. अनुभवाला सरळपणे सामोरी आहे.तरुण पिढीच्या स्पंदनांचा, विचार-भावनांचा कवितेतून जाहीर उच्चार दिसतो. स्वातंत्र्योत्तर काळातील समाजवास्तवाचे कठोर दर्शन घडविणारी कविता आहे. महानगरातील मध्यमवर्गीय माणसांच्या समस्यांप्रमाणे ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी माणसांच्या समस्यांचा वेध कवितेतून घेतला. व्यक्तीतून समष्टीत व समष्टीतून व्यक्तीत विलीन होण्याची प्रक्रिया सहजतेने घडविणे, हे या कवितेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. अनेक कवितांचे हिंदी, तेलगू, तामीळ, गुजराती, राजस्थानी, पंजाबी, कन्नड व इंग्रजी इत्यादी भाषांतून अनुवाद झाले. महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील अनेक विद्यापीठांतील मराठीच्या अभ्यासक्रमात बऱ्याच कवितांचा समावेश झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कारासह प्रतिष्ठेचे अनेक वाङ्मयीन पुरस्कार त्यांना मिळाले. 'युगवाणी' ह्या विदर्भ साहित्य संघाच्या वाड्मयीन मुखपत्राचे ते संपादकी होते. बदलत्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक वास्तवाचे भान राखून दारुण वास्तवात सामर्थ्याने उभे राहून संघर्ष करणाऱ्या सामान्य माणसाच्या जगण्यातील दुःख, निराशा व अस्वस्थता यांचा गांभीर्याने वेध घेणारा १९८० च्या दशकातील एक महत्त्वाचा कवी म्हणून समकालीन कवितेला त्यांचे विशेष योगदान आहे.