Logo
Logo
नारायण हरी आपटे यांचे छायाचित्र

नारायण हरी आपटे

अल्प परिचय

सामान्य वाचकाचे सामान्य लेखक ही बिरुदावली मिरवण्यात धन्यता मानणारे वाचकप्रिय' आपटे यांचा जन्म समडोली, जि. सातारा येथे झाला. प्राथमिक शिक्षणही याच गावी झाले. हायस्कूल शिक्षणाकरता साताऱ्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. या काळातच हरिभाऊ आपटेंच्या कादंबऱ्यांचा त्यांच्यावर विलक्षण प्रभाव पडला. ध्येयवादाचे बीज मनात रुजू लागले. तशातच शिवरामपंत परांजपे ह्यांच्या 'काळ' या पत्रातील जहाल विचारसरणीच्या परिणामाने स्वातंत्र्य चळवळीकडे त्यांचे मन ओढले गेले. या मनोवस्थेमध्येच त्यांनी पायी देशाटन करण्याचा निर्णय घेतला आणि १९०४ साली घर सोडले. दौलताबाद, वेरूळ, खानदेश, उत्तर प्रदेश, बंगाल अशी हजारो मैलांची पदयात्रा घडल्यामुळे परिस्थितीचे त्यांना बारकाईने दर्शन घडले. अनेक थोर व्यक्तींचे विचार ऐकण्याची संधी प्राप्त झाली. हिंदी व बंगाली या भाषांचा परिचय झाला. प्रवासाच्या शेवटच्या टप्यात त्यांचे जयपूर येथे बराच काळ वास्तव्य घडले. या वास्तव्यात त्यांनी उर्दू आणि संस्कृत ह्या भाषांची ओळख करून घेतली व राजपुतांचा इतिहासही अभ्यासला. त्यातून त्यांचा ध्येयवादी दृष्टिकोन बळावला. त्याचीच परिणती म्हणून, १८व्या शतकातील महाराष्ट्राच्या राजकीय जीवनाचे चित्र रेखाटणारी 'अजिंक्यतारा' ही कादंबरी त्यांनी १९०७ साली जयपूरमध्येच लिहून १९०९ मध्ये प्रसिद्ध केली. १९०४ ते १९१२ असा आठ वर्षांचा त्यांचा काळ प्रवासातच गेला. या कालावधीत बराच काळ त्यांना एका ख्रिस्ती कुटुंबात आश्रय लाभला होता. तेथे मिळालेल्या जिव्हाळ्यामुळे त्यांची दृष्टी व्यापक झाली. १९१२ मध्ये ते आपल्या गावी परतले. पुढे १९१७ साली साताऱ्याजवळच्या कोरेगावात ते स्थायिक झाले. 'किर्लोस्कर' मासिकाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी संपादनात साहाय्य केले. कोरेगावला स्वतःचा छापखाना काढून काही काळ 'मधुकर' नावाचे मासिक आणि 'आल्हाद' नावाचे साप्ताहिक त्यांनी चालविले. स्वतःचे प्रकाशनही काढले. पण भांडवलाअभावी हा व्यवसाय बंद करावा लागला. कादंबरी लेखन आणि कथा लेखन हे ब्रीद मात्र त्यांनी राखले. सामाजिक, ऐतिहासिक, अद्भुतरम्य अशा वैविध्यपूर्ण विषयांवरच्या व वेगवेगळ्या तंत्रशैलीच्या सुमारे पंचेचाळीस कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. 'कपटजाल' (१९१३), 'पिशाच्च साधने अथवा असुरी संपत्तीचा प्रभाव' (१९२०), 'रत्नगुंफा' (१९३३), 'अजरामर' (१९४६), या त्यांच्या कादंबऱ्यांतील अद्भुताची नवीन सृष्टी पाहून वाचक लुब्ध झाले. 'लांछित चंद्रमा' (१९१३), 'राजपुतांचा भीष्म' (१९१९), 'संधिकाल' (१९२२), या राजपुतांच्या इतिहासावर आधारलेल्या वीर पुरुषांच्या कादंबऱ्यांमधून त्यांनी स्वदेशाभिमानाला जागविले. आपल्या सामाजिक कादंबऱ्यांमधून मध्यमवर्गीयांच्या जीवनचित्रणाला हात घातला. सासू-सुनांचा कलह रेखाटणारी 'वंदावे की निंदावे' (१९१३), विलायतेत शिक्षण घेणाऱ्या तरुण पिढीच्या वृत्ति - प्रवृत्तींचे दर्शन घडविणारी 'दुरंगी दुनियेत' (१९२२), फसवून वृद्धाशी विवाह झाल्यामुळे तरुणीच्या वाट्याला आलेल्या भेसूर जीवनाचे करुण चित्रण करणारी 'न पटणारी गोष्ट' (१९२३)- या कादंबरीवर आधारित 'प्रभात'चा 'कुंकू' चित्रपट त्या काळात अतिशय गाजला- शिक्षणाने व संस्कारांनी सुजाण बनलेल्या तरुणाच्या हळुवार मनाचा वेध घेणारी 'पहाटेपूर्वीचा काळोख' (१९२६), या त्यांच्या कादंबऱ्या मनाचा ठाव घेणाऱ्या आहेत. 'उमज पडेल तर' (१९३४), 'अपेक्षा' (१९४९), या कादंबऱ्या संसाराचा आदर्श कसा निर्माण करावा, हा संदेश देतात तर 'जाऊबाई' (१९५०) ही कादंबरी एकत्र कुटुंबातील थोरल्या जावेचे मनोज्ञ दर्शन घडविते. 'कोणी कोणाचे नव्हे' (१९५९) या कादंबरीतून आपटे यांनी जी तडफदार तरुणी शब्दबद्ध केली आहे, तिला तोड नाही. 'त्या अबला होत्या' (१९२८), 'संगदोष' (१९४३) या सामाजिक समस्यांचा ऊहापोह करणाऱ्या कादंबऱ्या त्यांच्या समाजचिंतनाची साक्ष देतात. आम्ही दोघे' या त्यांच्या कादंबरीत कथानकाची प्रमाणबद्धता, सुंदर भाषाशैली, उपमांमधून व प्रतिमांमधून व्यक्त होणारी सहजता व दोघांच्या आंतरिक संघर्षाचे प्रत्ययकारी चित्रण यांचा समन्वय झाल्याने, त्यांच्यातल्या अस्सल कलावंताचे दर्शन घडते. असे त्यांचे कादंबरी लेखन विपुल, वैविध्यपूर्ण व तंत्रकुशल आहे. चार-दोन रेषांच्या फटकाऱ्यांनी स्वभावचित्र रेखाटणे, वाचकांना आत्मीयता वाटेल अशा पद्धतीने जीवन चित्रण करणे, बोधवादी दृष्टी ठेवूनही कथानकाचा सांधा बिघडू न देणे, सहज व ओघवती भाषाशैली व परिणामकारक निवेदन करण्याची हातोटी, मध्यमवर्गाच्या ज्ञात-अज्ञात कंगोऱ्यांना आत्मीयतेने उलगडण्याची क्षमता व त्याला उभारी देण्याची वृत्ती, या सर्व गुणांनी त्यांची कादंबरी लक्ष वेधून घेते. त्यांचे कथालेखनही मध्यमवर्गीयांच्या जिव्हाळ्याने ओतप्रोत भरलेले आहे. कथालेखक हा वाचकाचा सन्मित्र असावा, ही त्यांची भूमिका असल्याने त्यांच्या कथांवर बोधवादाची दाट छाया पडलेली आहे. पण मध्यमवर्गीय जीवनाच्या विविध छटा आपल्या कथांमधून रंगवून सांगण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे व वास्तवावर आधारित जीवन चित्रणामुळे त्यांच्या कथाही परिणामकारक झालेल्या आहेत. 'बनारसी बोरे', 'आराम-विराम', 'हसा किंवा रुसा', 'कोंडकणी' हे त्यांचे कथासंग्रह लोकप्रिय आहेत. 'नाव नसलेली गोष्ट', 'तान्हेली कैदी', 'सुमती', 'कल्पनेची भरारी' यांसारख्या कथा त्यांच्या शैलीचे आगळे दर्शन घडवितात. प्रदीर्घ काळ कादंबरी लेखन करणारे व बोधवादाची पालखी खांद्यावर घेऊनही, लोकप्रियतेचा ध्वज कायम फडकवीत ठेवणारे यशस्वी कादंबरीकार, कथाकार म्हणून आपटे यांचे कायम स्मरण राहील.