प्रोफाइल लोड करत आहे...
मीना शेटे-संभू
अल्प परिचय
मीना शेटे-संभू या ज्येष्ठ पत्रकार, अनुवादक, लेखिका, संपादक आणि अध्यापिका आहेत. त्यांनी एम.एस्सी., एम.फिल. (वनस्पतिशास्त्र), एम.जे.सी. (पत्रकारिता) आणि एन.डी. (डॉक्टर ऑफ नॅचरोपॅथी) या पदव्या प्राप्त केल्या असून, कथक नृत्याचेही प्रशिक्षण घेतले आहे. शैक्षणिक जीवनात त्यांनी विविध गुणवत्तापूर्ण यश संपादन केले असून क्रीडा, नाट्य, नृत्य आणि वक्तृत्व स्पर्धांमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी दैनिक सकाळमध्ये कोल्हापूर आणि पुणे येथे तब्बल २२ वर्षे कार्य केले. या काळात शोधपत्रकारितेच्या अनेक गाजलेल्या वृत्तमालिका, लेख, मुलाखती आणि परीक्षणांद्वारे त्यांनी सामाजिक प्रश्नांवर प्रभावी लेखन केले. त्यांच्या दोन हजारांहून अधिक लेखनकृती प्रकाशित झाल्या आहेत. पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना विविध संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले असून, स्त्री-पुरुष समानता विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांसाठी त्यांची निवड झाली होती. त्यांनी शिवाजी विद्यापीठात पत्रकारिता विषयाच्या मानद प्राध्यापिका म्हणूनही कार्य केले आहे.
गेल्या सोळा वर्षांपासून त्या अनुवाद क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी ७ हिंदी आणि १३६ इंग्रजी अशा एकूण १४३ पुस्तकांचे मराठीत अनुवाद केले आहेत. याशिवाय त्यांनी ६ पुस्तके आणि ३ ई-पुस्तके लिहिली असून, १५०हून अधिक पुस्तकांचे संपादन केले आहे. साहित्य, इतिहास, अध्यात्म, मानसशास्त्र, संशोधन, अर्थकारण, प्रवासवर्णन आदी विविध विषयांवरील त्यांच्या अनुवादांना वाचकांची पसंती लाभली आहे. त्यांच्या वैद्य, हकीम आणि डॉक्टर या अनुवादित पुस्तकाला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.
पत्रकारिता, अनुवाद आणि साहित्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना विविध राज्यस्तरीय व राष्ट्रीय सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. आकाशवाणी, दूरदर्शन, सह्याद्री वाहिनी आणि इतर माध्यमांवर त्यांच्या कार्याविषयी विशेष मुलाखती प्रसारित झाल्या आहेत.