Logo
Logo
कमलाबाई विष्णू टिळक यांचे छायाचित्र

कमलाबाई विष्णू टिळक

अल्प परिचय

पूर्वाश्रमीच्या कमला अनंत उकिडवे. मॅट्रिकला मुलींत पहिली आली. संस्कृतसाठी जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती, चॅटफिल्ड, तसेच यमुनाबाई दळवी पारितोषिक मिळाले. इंग्रजी साहित्य घेऊन एम. ए. प्रथम वर्गात उत्तीर्ण व त्यानंतर हुजूरपागेच्या मुलींच्या महाविद्यालयाच्या प्राचार्या म्हणून कार्यरत होत्या. त्याचप्रमाणे बनारस येथे मुलींच्या महाविद्यालयात इंग्रजीच्या प्राध्यापक आणि नंतर प्राचार्या म्हणून नियुक्ती झाली. निवृत्तीनंतर फिल्म सेन्सॉर बोर्डाच्या सल्लागार समितीचे काम आठ वर्षे केले. त्यांचे 'हृदयशारदा' (१९३२), 'आकाशगंगा' (१९४४), 'अश्विनी' (१९६३), 'सोन्याची नगरी' (१९८५) हे कथासंग्रह; तर 'शुभमंगल सावधान' (१९७५) ही कादंबरी; शिवाय वैचारिक लेखनामध्ये 'स्त्री-जीवन विषयक काही प्रश्न' (१९४९), 'स्त्री- जीवनाची नवी क्षितिजे' (१९६५), 'युधिष्ठिर' (१९७१) इत्यादी. १९७५ नंतर बालवाङ्मय आणि एकांकिका असे लेखन केले. रत्नाकर', 'मनोहर', 'यशवंत', 'स्त्री' या मासिकांमधून सुरुवातीच्या काळात त्यांनी कथालेखन केले. त्यांच्या कथांना दर्जेदार म्हणून अनेक नामवंतांनी नावाजले. वा. ना. देशपांडे यांनी, 'प्रसंगांचा चटकदारपणा, चरित्र-चित्रणाचा मार्मिकपणा तंत्रावरील प्रभुत्व व भाषेचे सहज सौंदर्य...' या त्यांच्या गुणांचा निर्देश केला आहे. 'कमलाबाईंनी आपल्या गोष्टींतून स्त्रीहृदय आणि स्त्री- जीवन जास्त समरसतेने रेखाटले आहे...' असे शांता माडखोलकरांनी म्हटले आहे ('प्रतिभा' ३०-०१-१९३३) 'त्यांच्या कथांतील चिंतनशीलता हा दुर्मीळ विशेष आहे...' असे वि. स. खांडेकर यांनी गौरविले आहे. (३०-०५-१९७० ) स्त्री- विश्वाचे चित्रण याआधी पुरुष आपल्या कल्पनेने स्त्रीच्या भावभावना रेखाटत होते. पण कमलाबाईंनी स्त्रीला जाणवलेली भिन्नभिन्न स्त्री-रूपे रेखाटली आहेत. त्यांतील वेगवेगळ्या छटा, गुंतागुंत हे उलगडून दाखविले. तेसुद्धा अगदी अकृत्रिमपणे आणि तटस्थपणेही, ना त्यात स्त्री - कैवार होता; ना स्त्री-द्वेष्टेपणा आणि तरीही कथेची कलात्मक बाजू त्या कधी विसरल्या नाहीत. स्त्रिया नव्याने शिकू लागल्या, आपल्या आयुष्याबद्दल विचार करू लागल्या; पण त्यातूनही काही प्रश्न निर्माण झाले आणि मग दुविधा ! मनातील या खळबळीचा वेध अतिशय तरलपणे त्यांनी 'हृदयशारदा' या कथेत घेतला आहे. सरल आणि नलिनी यांचे हृद्गत आणि त्यानंतर नलिनीच्या मनातील सूक्ष्मातिसूक्ष्म भावना त्यांनी छान चित्रित केल्या आहेत. घर-संसार गृहिणीपण, तिचे सौंदर्य महत्त्वाचे की पतीच्या सर्जनशीलतेला समजून घेण्याची बौद्धिकता, शिक्षणामुळे आलेली परिपक्कता महत्त्वाची आहे का ? हा प्रश्न जरी नलिनीला पडलेला असला, तरी तो तत्कालीन शिकणाऱ्या मुलींच्या मनाचेच प्रतिनिधित्व करणारा आहे. हे सूक्ष्म विश्लेषण हा यासारख्या कथांचा महत्त्वाचा विशेष !