Logo
Logo
चिंतामण विनायक जोशी यांचे छायाचित्र

चिंतामण विनायक जोशी

अल्प परिचय

चिंतामण विनायक जोशी यांचा जन्म पुणे येथे झाला. पुण्यातील नूतन मराठी विद्यालयामधून १९०९ मध्ये मॅट्रिक व १९१३ मध्ये फर्गसन महाविद्यालयातून तत्त्वज्ञान हा विषय घेऊन ते बी. ए. झाले. दोन वर्षांनी पाली व इंग्रजी हे विषय घेऊन ते एम. ए. झाले. पालीचे गाढे विद्वान प्राध्यापक धर्मानंद कोसंबी यांचे विद्यार्थी असणाऱ्या जोशी यांच्यावर त्यांच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. पालीच्या अभ्यासाद्वारे बौद्ध धर्माचाही परिणाम त्यांच्या मनावर झाला होता. जोशी यांचे वडील विनायकराव हे चौदा वर्षे 'सुधारक' पत्राचे संपादक होते. 'सुधारक' पत्र कर्जबाजारी झाले, त्या वेळी पत्नीचे दागिने विकून त्यांनी काही कर्ज फेडले होते. जोशींच्या मालकीच्या वडिलार्जित विष्णुमंदिरात लहानपणी जोशी यांनी बरीच कीर्तने ऐकली. कीर्तनांमुळे पुराण कथांशी व प्राचीन वाङ्मयाशी त्यांचा परिचय झाला. त्यांना वाचनाची अनावर आवड होती. कथाकार गो. गं. लिमये व ना. गं. लिमये या दोन मामांच्या साहाय्याने जोशींनी १९०५ साली 'तरवार' नावाचे हस्तलिखित वर्तमानपत्र काढले व तीन वर्षे चालविले. त्यात गोष्टी, चुटके वगैरे मनोरंजक विभाग लिहिण्याचे काम जोशींकडे असे. इंग्रजी पाचवीत असताना ‘संपादन व न्हावी' या नावाचा गमतीदार लेख त्यांनी लिहिला. तो पुढे पाच वर्षांनी महाविद्यालयाच्या त्रैमासिकात प्रसिद्ध झाला. १९२६ पर्यंत गंभीर व विनोदी अशा दोन्ही प्रकारचे लेखन करणाऱ्या जोशींनी मासिकांकडून विनोदी लेखांचीच मागणी सातत्याने येत राहिल्यामुळे विनोदी साहित्य निर्मिती केली. मूळ गंभीर प्रकृतीचे जोशी वयपरत्वे अधिक गंभीर होत गेले, तरी त्यांच्या विनोदी लेखनाच्या निर्मितीत खंड पडला नाही. असामान्य प्रतिभेचे, विशाल मनोवृत्तीचे व अस्सल मराठी गद्याचे निर्माते जोशी हे अहमदाबाद येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय निवडणुकीत वि.द. घाटे यांच्याकडून ते पराभूत झाले. जोशी यांच्या व्यावसायिक जीवनाची सुरुवात अमरावतीला शिक्षक म्हणून झाली. १९१८ साली ते रत्नागिरी हायस्कूलमध्ये गेले. १९२० मध्ये बडोदा येथील महाविद्यालयात आरंभी इंग्रजीचे - मराठीचे व नंतर पालीचे अध्यापन ते करू लागले. १९२८ पासून बडोदा सरकारने त्यांची नेमणूक राजदप्तरदार (डायरेक्टर ऑफ अर्काइव्हज) म्हणून केली. महाविद्यालयात पूर्णवेळ शिकविणारे जोशी १९२९ नंतर मात्र फक्त बी. ए., एम. ए. च्या विद्यार्थ्यांना पाली शिकवीत. १९४९ साली सेवानिवृत्त होऊन ते पुण्यास परतले. पाली भाषेच्या अभ्यासातून त्यांनी काही ग्रंथरचना केली, शिवाय परदेशातील नियतकालिकांतूनही त्यांचे लेख प्रसिद्ध झाले. पालीतील पुराण ग्रंथांचे संशोधन व संकलन करणारे व्यासंगी अभ्यासक म्हणूनही त्यांना कीर्ती लाभली. जातकातील निवडक गोष्टी' किंवा 'मॅन्युअल ऑफ पाली' अशी परिचयात्मक पुस्तके त्यांनी लिहिली. 'शाक्यमुनी गौतम' (१९३५), 'बुद्ध संप्रदाय व शिकवण' (१९६३) हे ग्रंथ व 'सयाजीराव महाराज गायकवाड' यांचे चरित्र यांनी लिहिले. वडिलांच्या निधनामुळे अपुरी राहिलेली 'प्रवरा' ही कादंबरी त्यांनी पुरी केली. याखेरीज 'कर्मवीर परशुराम' (१९४५), 'चित्रकार पिंपळखरे' (१९५९) ही चरित्रे; 'बालयोगी' (१९६४) ही कादंबरी; 'वडाची साल पिंपळाला (१९५७), व 'त्रिसुपर्ण' (१९६२) ही नाटके; 'देवनगरच्या पंचक्रोशीत ' (१९३६) हे स्थलवर्णन अशी वैविध्यपूर्ण साहित्य निर्मिती त्यांनी केली असली, तरी जोशी हे नाव समस्त मराठी वाचकांना विनोदी लेखक म्हणूनच सुपरिचित आहे. 'सत्याचे प्रयोग', 'लग्न पहावं करून', 'सरकारी पाहुणे ' हे त्यांचे हास्यरसप्रधान बोलपट गाजले आहेत. १९४२