प्रोफाइल लोड करत आहे...
अनंत आत्माराम काणेकर
अल्प परिचय
अनंत काणेकर यांचा जन्म मुंबईला झाला. मुंबईतील गिरगावच्या चिकित्सक समूह हायस्कूलमधून ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले (१९२२). सेंट झेवियर महाविद्यालयामधून संस्कृत विषयात बी. ए. पदवी संपादन केली (१९२७), आणि १९३०-३२ मध्ये वकिलीची सनद घेतल्यानंतर त्यांनी मुंबईत वकिली सुरू केली. ती जेमतेम २-३ वर्षे केल्यावर अन्य व्यवसाय-वाटचालीसमवेत त्यांनी साहित्याच्या प्रांतात मुशाफिरी केल्याचे दिसते. महाविद्यालयीन दिवसात 'चांदरात आणि इतर कविता' या त्यांच्या कवितासंग्रहातल्या काही कविता काणेकरांनी लिहिल्या होत्या. त्याच वेळी सुटीतल्या दोन-अडीच महिन्यांत 'डॉल्स हाउस' या इब्सेनच्या नाटकाचा मराठी अनुवाद त्यांनी केला. दुसरी गोष्ट त्या आठ-दहा दिवसांत करून टाकली ती म्हणजे हस्तलिखितात पडलेल्या 'चांदरात' मधल्या बऱ्याच कवितांपैकी तीस-बत्तीस कवितांचा इंग्रजी अनुवाद करून टाकला (१९२७). साधारण १९३० ते १९३५ या कालखंडात मराठी नाट्यक्षेत्रात नवे वारे वाहू लागले. वा. वा. भोळे यांचे 'सरलादेवी', वर्तकांचे १९३३ मधले 'आंधळ्यांची वि. ग. जोशी शाळा', १९३४ मधले अत्र्यांचे 'घराबाहेर' ही नाटके नव्या प्रवाहाची निदर्शक म्हणून नमूद करण्यासारखी आहेत.
याच काळात अनंत काणेकरांनी इब्सेन च्या 'डॉल्स हाऊस' चे 'घरकुल' या नावाने मराठी रूपांतर केले.त्याला प्रसिद्धी चा प्रकाश मात्र १९४१ साली दिसला. काणेकरांनी जे नाट्यलेखन केले, ते मुख्यतः रूपांतरित स्वरूपाचे असून 'निशिकांताची नवरी' (गोल्डस्मिथ - १९३८), 'फास' (डब्ल्यू. ओ. सोमिन - १९५०), 'पतंगाची दोरी' (जेम्स बॅरी - १९५१), 'झुंज' (जॉन गॉल्सवर्दी - १९७४) ही त्यांची 'घरकुल'खेरीज इतर रूपांतरित नाटके होत. प्रसंगनिष्ठ विनोदाने रसिकांचे मनोरंजन करणारे बाळबोध वळणाचे निशिकांताची नवरी' हे नाटक व 'पतंगाची दोरी' मधील प्रमुख व्यक्तिचित्रण सरस साधले आहे. 'फास'मध्ये दोनच पात्रे असून त्यातील उत्कंठा अखेरपर्यंत कायम ठेवण्याचे त्यांचे कसब निःसंशय कौतुकास्पद आहे, असा अभिप्राय डॉ. अ. ना. देशपांडे (आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास) यांनी नोंदविला आहे.
काणेकरांनी एकांकिका लेखनाच्या क्षेत्रातही रूपांतराचा प्रयत्न केला. 'धूर आणि इतर एकांकिका' (१९४९) या
संग्रहातील 'सैंपाकणी', 'धूर', 'श्री शिवाजी शहाजी भोसले', 'पैजार' आणि 'बांदिवलीत डॉक्टर' या
एकांकिका स्वतंत्र स्वरूपाच्या तर 'आत्महत्या', 'बांदिवलीच्या मास्तरणी' व 'संप' या रूपांतरित आहेत. 'डिक्टेटर' ही मात्र भाषांतरित आहे. भावगीतकार काणेकर 'घरकुल'च्या प्रसिद्धीचे १९४१ हे वर्ष मराठी नाट्यवाङ्मयाच्या इतिहासात आणखी एका दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. १९४० च्या सुमारास मराठी रंगभूमी अगदी मोडकळीस आली होती. १९३३ ते १९४० या काळात मराठी रंगभूमीला ज्यांच्यामुळे प्रगतीची आणि वैभवाची अवस्था प्राप्त झाली त्या 'नाट्यमन्वंतर' आणि 'बालमोहन' या नाटक कंपन्यांच्या कर्तृत्वाचा बहर या कालखंडाच्या अखेरीस बराचसा ओसरून गेला होता. अत्र्यांना रंगभूमीपेक्षा रजतपटाचे आकर्षण अधिक वाटू लागले. १९४० च्या आसपास मराठी रंगभूमी चैतन्यहीन झाली होती. बोलपटांचा वाढता प्रभाव, नाट्यकला
निर्वासित होण्यास कारणीभूत ठरत होता. १९४१ च्या सुमारास मो. ग. रांगणेकरांनी वृत्तपत्रसृष्टीचा त्याग करून
नाट्यसृष्टीत पदार्पण केले. 'नाट्यनिकेतन' मधून नव्या नाटकांचे आगमन होऊ लागले. त्यात संस्थापनेपासून अनंत काणेकरांचा सहभाग होता. अनंत काणेकरांच्या 'चांदरात' मधल्या काही कवितांचा समावेश रांगणेकरांच्या नाटकात झाला आहे. ज्योत्स्ना भोळे यांनी ही गीते समरसून गाइली आणि ती अत्यंत लोकप्रिय झाली. विशेषतः 'आला खुशीत समिंदर', 'चल ग सखे रानामधे, चाफ्याचं फूल तुझ्या कानामधे' अशा कविता फार लोकप्रिय झाल्या. 'तू माझी अन् तुझा मीच', 'एकलेपणाची आग' अशी काणेकरांची भावगीते वर्तकांनी हौसेने आपल्या नाटकात घातली. भावगीतकार म्हणून काणेकरांची महाराष्ट्रभर कीर्तीही झाली आणि ‘आता कशाला उद्याची बात' या गाण्याने तर पुढे लोकप्रियतेचा कळस गाठला. 'प्रभात' कंपनीच्या 'माणूस' चित्रपटाची पटकथा काणेकरांनी लिहिली, आणि रंगभूमीबरोबरच रजतपटामध्येही काणेकरांचे नाव झाले.
यापूर्वीच्या काणेकरांच्या 'चांदरात' १९३३ मधील कवितांनी तोवर मराठी काव्याच्या प्रांतात सर्वांचे लक्ष वेधले होते. प्रचलित कवितेची धाटणी बदलून तिची 'चाल' आधुनिक आकर्षक आणि वास्तवाभिमुख होण्याच्या पाऊलखुणा 'चांदरात'मध्ये आहेत. माधवराव पटवर्धनांनी म्हटल्याप्रमाणे या कवितेत आशेचे उद्गार, निराशेचे निःश्वास, विनोदाचा विलास आणि विडंबनविहारही आहे. विविध रुचीच्या रसिकांना रंगविण्याचे त्यात भरपूर सामर्थ्य आहे. अतिरिक्त व विसंगत कल्पना आणि शैली यांची विडंबने (विशेषतः रविकिरण मंडळाच्या काळातील कवितांबाबत ) विनोदप्रिय रसिकांना मार्मिक वाटण्याजोगी आहेत आणि प्रेमगीते चाहणाऱ्या रसिकांची हौस पुरविण्याचे भरपूर सामर्थ्य या कवितेत आहे. 'कवने', 'दोन भक्त' यांमधील कविकल्पनेचे तत्कालीन समीक्षकांनी कौतुक केले. काणेकरांनी 'मराठी कवितेच्या क्षेत्रात नव्या मनूच्या पताका फडकविल्या' असे के. नारायण काळे या त्यांच्या समकालीन समीक्षकाच्या दृष्टीतून दिसते. नव्या वस्तुनिष्ठ भावना, कल्पना यथार्थतेने व्यक्त करण्याच्या दृष्टीने काव्यातील परंपरागत संकेत अपुरे पडतात, असा अनुभव आल्यामुळे आणि त्या अनुभवाशी एकनिष्ठ राहण्याचे काणेकरांनी ठरविल्यामुळे त्यांनी १९३१ नंतर काव्यलेखन कमी केले. 'चांदरात' च्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत काणेकरांनी याचा उल्लेख केला आहे. ते म्हणतात, “आजूबाजूच्या जगाकडे पाहिल्यानंतर ज्या वस्तुनिष्ठ भावना किंवा कल्पना माझ्या मनात उत्पन्न होतात, त्या गद्यात मी चांगल्या तऱ्हेने व्यक्त करू शकेन किंवा त्यांपैकी ज्या काव्यात व्यक्त करण्यासारख्या असतील, त्या व्यक्त करण्याचे नवीन माध्यम मला अजून सापडत नसेल.
"स्वतःच्या प्रतिभेच्या वैशिष्ट्यांशी आणि मर्यादांशी एकनिष्ठ राहण्याची काणेकरांची ही वृत्ती निःसंशय अभिनंदनीय आहे. तसेच बदलत्या काळाची व व्यक्तित्वाची हाक ओळखण्याची त्यांची कुशलताही लक्षणीय आहे. 'चौकोनी आकाश' मधून (१९७४) त्यांच्या संपादित कवितांच्या प्रा. रमेश तेंडुलकर यांच्या निरीक्षणातून ही बाब पुनः अधोरेखित झाली आहे.कथाकार काणेकरांचा एक वेगळा दृष्टिकोन त्यांच्या कथासंग्रहातून प्रत्ययाला येतो. ना. सी. फडके, वि.स. खांडेकर, य. गो. जोशी, वि. वि. बोकील, द.र. कवठेकर इत्यादी लेखकांच्या कथावाङ्मयापासून काणेकरांची कथा बहुधा अलिप्त राहिलेली आहे. अतिरेकी भावव्याकुलता, योगायोग इत्यादीपासून ती दूर आहे. वर उल्लेखिलेली बदललेली भूमिका बहुदा कथालेखनाबाबतही कार्यरत झाली असावी. कारण त्यांच्या कथालेखनात भावना व बुद्धी या दोन्ही शक्तींच्या