प्रोफाइल लोड करत आहे...
माधव मुकुंद गोखले
अल्प परिचय
नमस्कार, मी माधव मुकुंद गोखले.
गेल्या चार दशकांहून थोडा अधिक काळ मी मराठी आणि इंग्रजी पत्रकारितेशी संबंधित आहे. नोव्हेंबर १९८४पासून दै. श्रमिकविचार, दै. महाराष्ट्र हेरॉल्ड, दै. इंडियन एक्स्प्रेस, दै. सकाळ टाइम्स, दै. सकाळ या दैनिकांमध्ये व साप्ताहिक सकाळमध्ये वार्ताहर ते संपादक अशा विविध जबाबदाऱ्या मी सांभाळल्या आणि त्या त्या जबाबदाऱ्यांचा भाग म्हणून इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रसंगानुरूप लिहित राहिलो.
सुरुवातीच्या काळात यातले बहुतेक लिखाण अर्थातच गेल्या चाळीस वर्षांमधील पुणे, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात घडलेल्या अनेक महत्त्वाच्या घटनांच्या बातम्यांच्या स्वरूपातले आहे. काही थोडे वेगवेगळ्या विषयांवरचे लेख आहेत, मुलाखती आहेत. ‘महाराष्ट्र हेरॉल्ड’ या इंग्रजी दैनिकामध्ये मी दोन वेगवेगळ्या काळांत साप्ताहिक स्तंभही लिहीत होतो. आधी वृत्तसंपादक आणि नंतर कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर अग्रलेख आणि संपादकीय स्वरूपाचेही काही लिखाण केले. हे लिखाण प्रामुख्याने पर्यावरण, वन्यजीवन, नागरी प्रश्न, सांस्कृतिक विषय, खाद्यसंस्कृती अशा विषयांवरचे आहे.
सध्या मी ‘सकाळ प्रकाशना’बरोबर सल्लागार संपादक म्हणून काही पुस्तकांवर काम करतो आहे. पाच पुस्तकांचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचारदर्शन’ संच हा अलीकडेच पूर्ण झालेला पुस्तक प्रकल्प.
माजी पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी लिहिलेल्या ‘Indira Gandhi - A Life In Nature’ या चरित्रग्रंथाचे ‘निसर्गयात्री इंदिरा गांधी’ आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.के मलिक यांनी लिहिलेल्या ‘India's Military Conflicts And Diplomacy: An Inside View of Decision-Making’ या पुस्तकाचे ‘भारताचे लष्करी संघर्ष आणि राजनय: निर्णय प्रक्रियेचे अंतरंग’ हे अनुवाद मी केले आहेत. ही दोन्ही भाषांतरे सकाळ प्रकाशनानेच प्रसिद्ध केली आहेत. ‘भारताचे लष्करी संघर्ष’ या अनुवादाला इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिराचा २०१७चा उत्कृष्ट अनुवादाचा पुरस्कारही मिळाला आहे.
‘सकाळ’च्यावतीने २००७मध्ये ब्राझिलमधील ‘झिरो होरा’ या माध्यमसमूहाचा अभ्यास दौरा करण्याची, तसेच बँकॉक, कोलंबो आणि दुबई येथे झालेल्या ‘एज्युकॉन’ या कुलगुरू परिषदांचे वार्तांकन, मलेशियातील ‘पेमान्डू’ कार्यक्रमाचा अभ्यास तसेच तेल-अविव (इस्राईल) येथे झालेल्या सायबर सिक्युरिटी या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे वार्तांकनही करण्याची संधीही मला याकाळात मिळाली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओपन लर्निंगच्या पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी पत्रकारितेची तत्त्वे, प्रक्रिया व व्यवहार या विषयावरील पुस्तकाच्या लेखनातही माझी सहभाग आहे. पत्रकारिता अभ्यासक्रमाशी मी बातमीदारी, संपादन आणि भाषा या विषयांवरील अभ्यागत व्याख्याता म्हणूनही संलग्न आहे.
माझे काही लिखाण https://madhavgokhale.blogspot.com/ येथे वाचता येईल.